जालना : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. मराठा समाजाने त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडे लिहून दिल्या असून, त्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असून, आता सरकारला एकच संधी असून, २९ सप्टेंबरनंतर मराठा समाज थांबू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे आज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उद्देशून बोलताना राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला. या बैठकीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस यांनी मराठा समाजावर लाठीचार्ज केला. त्यांनी सर्वांवर अन्याय केला आता २०२४ ला आमचा दणका कळेल, अशा शब्दात इशारा दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. त्यांनी घेतलेली शपथ पूर्ण झाली नाही. सगेसोयरेच्या अंमलबजावणीबाबत आमची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले.
आपल्या आंदोलनाला एक वर्ष झाले. तरी प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आता मागे हटणार नाही. मराठा समाज असा एकजूट राहिला तर हा प्रश्न सुटेल, असेही जरांगे पाटील म्हणाले. आपण समाजाला शब्द दिला आहे. कुणाचे कुटुंब उघडे पडू देणार नाही. आता उपोषणाने आरक्षण मिळवायचे आणि आमदारही पाडायचे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.
२९ सप्टेंबरला राज्यव्यापी उपोषण
आता आपल्याला २९ सप्टेंबर रोजी उपोषण करायचे आहे आणि ते राज्यभर असेल. हे उपोषण शेवटचे आणि आरपारचे उपोषण असेल असेही जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीस यांना इशारा
देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून आमच्यावर लाठीचार्ज घडवून आणला. गिरीश महाजन यांनी जालन्यातील काही भाजप नेते हाताशी धरले आणि देशात हल्ला झाला नाही, एवढा हल्ला आमच्यावर झाला. पणआमच्या नादाला लागू नका. तुम्हाला वाटेल हा फक्त धमक्याच देत आहे. पण २०२४ च्या निवडणुकीला दणका कळेल. थोडे थांबा, असा सूचक इशारा मनोज जरांगे यांनी दिला.