लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील कोळगाव तळयामध्ये बेकायदेशीरपणे हजारो ब्रास मुरूम उत्खनन करणा-यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यास जबाबदार मंडळ अधिकारी सानिया सौदागर व तलाठी दिलीप देवकते यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, रेणापूर समोर संभाजी आरमार संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
एक वर्षापासून गावातील लोकप्रतिनिधी, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आर्थिक संगणमताने बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करून करोडो रुपये कमविले आहेत. शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडविण्याचे काम केलेले आहे. तरीही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या दोन्ही अधिका-यांना पाठीशी घालत आहेत. अवैध उत्खनन करणा-यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. दोन्ही अधिका-यांचे निलंबन होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.