कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे यंदा ही कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली. मात्र, या सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत असून आपआपल्या नेत्याचे बॅनर आणि पोस्टर झळकवत आहेत. तर अनेक सभासद बॅरिकेट्स तोडून सभास्थळी आल्याने पोलिस आणि सभासदांमध्ये चांगलीच झटापट सुरू आहे.
गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा गोकुळ शिरगाव फाईव्ह स्टार एमआयडीसी मधील महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पामध्ये होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच विरोधी गटाकडून सभा स्थळाच्या बाहेर आतमध्ये प्रवेश मिळत नसल्याने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तर विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी दाखल होताच कार्यकर्ते आक्रमक झाले. आणि थेट पोलिसांनी तयार केलेल्या बॅरिकेट तोडून आत प्रवेश केला. सभास्थळी देखील शौमीका महाडिक यांनी कार्यकर्त्यांना बसायला जागा नसल्याने त्यांच्यासोबत खालीच उभ्या राहिल्या.
सध्या पाटील मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी आणि बॅनरबाजी सुरू आहे. यामुळे सभेचे वातावरण तापले आहे. विरोधी संचालिका महाडिक यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येच चांगली झटापट झाली आहे. दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली असून सभास्थळी विरोधी गटाकडून नामंजूर, नामंजूरची घोषणाबाजी करून फलक झळकावण्यात येत आहेत.
विरोधी गटाच्या एका सभासदाने सभास्थळी थेट म्हैस आणली आहे. गोकुळ दूध संघावर सत्ता असलेल्या नेत्यांनी पशुवैद्यकीय टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. या सोबतच दररोज किमान ५० लीटर ही अट रद्द करण्यास विरोध आहे. संस्था वाढवल्या पण त्याप्रमाणे दूध संकलन वाढले नाही. ही अट रद्द करून तुम्ही बोगस मतदार तयार करत आहात. गोकुळ खासगी करण्याकडे वाटचाल होत आहे. अ वर्गातील संस्था एकूण ३६ टक्क्याने वाढल्या, परंतु दूध संकलन केवळ १३ टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे ५० लीटरची अट रद्द करू नये. अशी मागणी विरोधी गटातील सभासदांकडून होत आहे.