बांगला देशात ७६ गुन्हे दाखल, अडचणी वाढल्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगला देशातील हिंसाचारादरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना, त्यांची बहीण रेहाना यांच्यासह कारमधून पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर थेट भारतात आश्रयासाठी पोहोचल्या. दुसरीकडे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त केली. त्यानंतर देशात अंतरिम सरकार स्थापन झाले. दरम्यान त्यांनी देश सोडल्यानंतर ८ दिवसांनी हसीनांविरोधात खुनाचा पहिला गुन्हा दाखल झाला. यानंतर एकामागून एक तब्बल ७६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ६३ प्रकरणे हत्येशी संबंधित आहेत.
२२ ऑगस्ट रोजी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे डिप्लोमॅटिक पासपोर्टही रद्द केले. तेव्हापासून त्यांचे भारतातील वास्तव्य मर्यादित झाले. भारताच्या व्हिसा धोरणानुसार जर बांगलादेशी नागरिकाकडे भारतीय व्हिसा नसेल, तर तो येथे केवळ ४५ दिवस राहू शकतो. शेख हसीना भारतात येऊन २५ दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत कायदेशीररीत्या त्या आणखी २० दिवस भारतात राहू शकतात. पासपोर्ट रद्द केल्यानंतर हसीना यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण होण्याचा धोका आहे. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी हसिना यांना बांगलादेशच्या किमान दोन तपास यंत्रणांकडून मंजुरी आवश्यक आहे.
दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार एकमेकांच्या ठिकाणी आश्रय घेतलेल्या फरार लोकांना परत करण्याची मागणी करू शकतात. तथापि, भारत राजकीयदृष्ट्या संबंधित प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रत्यार्पण करण्यास नकार देऊ शकतो. परंतु जर त्या व्यक्तीवर खून, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले तर त्याचे प्रत्यार्पण थांबवता येणार नाही. या करारामुळे बांगलादेशने २०१५ मध्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते अनुप चेतिया भारताकडे सुपूर्द केले, असे ढाका ट्रिब्यूनने म्हटले आहे. भारताने आतापर्यंत बांगलादेशातून अनेक फरारी लोकांना परत पाठवले आहे.