मुंबई : वृत्तसंस्था
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर, राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्यावरून सरकारचा निषेध करण्यासाठी आज (रविवार) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी सरकारला ‘जोडे मारो’ आंदोलन करत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधत उपरोक्त सवाल केला. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरुजींनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिले आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडला, त्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्या बद्दल एक शब्दही का बोलत नाहीत, सर्वप्रथम याचे उत्तर द्यायला हवे.
एवढी वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहासात शिकवले की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजीना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. पण सूरतमधील सामान्य माणसाची लुट करायला गेले नव्हते, चुकीचा इतिहास आम्हाला एवढी वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला, त्यांना माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात? हे सांगितले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.