लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व जिल्ह्यामध्ये २ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ४१ ते ६१ किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
शनिवारपासून जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस आहे. रविवारीही दिवसभर पाऊस होता. मात्र आता मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतातील गोठ्यात असणारी जनावरे वाडी वस्त्यांवर तसेच शेतात राहणा-या ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी.
धोका नसलेल्या ठिकाणी वास्तव्याला यावे, नदीकाठच्या गावांनी सतर्क राहून स्वत:ची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे.
पुलावरून ओलांडताना काळजी घ्या
पुलावरून पाणी वाहत असताना व पूल ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना काळजी घ्यावी, नदी, नाले व तलावावर पोहण्यासाठी जाऊ नये. शाळकरी मुलांनी नदी-नाले व तलावावर जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांमार्फत करण्यात आले आहे.
परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी घ्या
मांजरा नदीला सध्या पूर नसला तरी दुथडी वाहत आहे. या नदीवर १५ ते १६ बंधारे आहेत. त्यातील सर्वच बंधारे जवळपास ७० ते ७५ टक्के भरलेले आहेत. त्यामुळे या बंधा-यांच्या नजीक असलेल्या गावांनीही सतर्कता बाळगावी,
घरणी नदीला पूर
चाकूर तालुक्यातील घरणी नदीला पूर आल्याने पर्यायी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे उदगीरला जाणारा नळेगाव मार्ग रस्ता बंद करण्यात आलेला आहे. रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस आहे. या पावसामुळेही अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी आले आहे.