25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रवस्तादांच्या तालिमीत अनेकांचा प्रवेश होणार : घाटगे

वस्तादांच्या तालिमीत अनेकांचा प्रवेश होणार : घाटगे

समरजित घाटगे अधिकृतपणे शरद पवार गटात

कोल्हापूर : मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की, ही परिवर्तनाची मुहुर्तमेढ आहे. आताच कुणीही विजयाचा आनंद साजरा करु नका, पुढच्या दोन महिन्यांत आपल्याला खूप काम करायचे आहे. कागलमध्ये प्रत्येक घराघरात शरद पवारांचा विचार आपल्याला घेऊन जायचा आहे. प्रत्येक घरापर्यंत तुतारी पोहोचवायची आहे, त्यासाठी काम करा. कागलमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार आहे. पक्षात किंबहुना वस्तादांच्या तालिमीत आणखी अनेकांचा प्रवेश होणार आहे, असा दावा समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.

अखेर भाजपामध्ये असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश झाला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना समरजितंिसह घाटगे म्हणाले की, शरद पवार यांनीच सांगितले की, सभा गैबी चौकात घ्या. काही जणांना वाटत होत गैबी चौकातच आपलीच सभा होईल. पण हा वस्तादांचाच गैबी चौक आहे. स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला. त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे. त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला तेच मी करणार. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचे राजकारण करणार. या कागलच्या भूमीत परिवर्तन करणारच, असा निर्धार समरजितसिंह घाटगे यांनी बोलून दाखवला.

माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद
मीडियाचे लोक मला विचारतात की, समोर जे कागलमधील मंत्री महोदय आहेत, जे पाच वेळा आमदार झाले आहेत, त्यांच्या बाजूने सगळे गट आहेत, त्यांच्याकडे महायुती, केंद्र, मोठमोठ्या संस्थांची ताकद आहे. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे शरद पवार आणि जनतेची ताकद आहे. मला आणखी काही नको, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.

घाटगे मंत्री होतील : पवार
तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू. जबरदस्त संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहका-यांनी दाखवून दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR