वलांडी : हसन मोमीन
लातूर सर्वत्र होत असलेल्या मूसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात पावसाळा सूरू होऊन तीन महीने उलटले देवणी तालुक्यातील सर्वत्र (मांजरा नदी )वगळता जलसाठे कोरडेच पहावयास मिळत होते. तालूक्यातील आनंदवाडी बोळेगाव येथील साठवण तलाव शंभर टक्के भरला आहे. आज होत असलेल्या पावसामुळे तलाव ओहरफ्लो झाला आहे तर टाकळी व बोंबळी तलाव पण शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
काही गावांतील तलाव मात्र पूर्ण क्षमतेने अद्यापही भरले नाही. दमदार पावसामुळे विहिरींच्या व बोअरच्या पाण्यात वाढ झाली आहे. जनावरांच्या चा-याचा प्रश्नही सुटला आहे. जून,जुलै व ऑगस्ट महिन्यांत सुरुवातीला पाऊस तुरळक प्रमाणत पिकापुरते पडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते मात्र १ सप्टेंबरच्या दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अर्धवाहीनी म्हणून ओळखली जाणारी मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धनेगाव उच्च पातळी बंधा-याचे गेट क्र ३,४,व ५ हे तीन्ही दरवाजे ३ मिटरने उचलण्यात आले असून सद्य स्थितीत दुपारी २.४५ पासून पाण्याचा १०३३.८३ क्युमेक्स मांजरा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.धनेगाव बॅराज मध्ये आता पर्यंत ७१ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती धनेगाव उच्चस्तरीय बंधा-याचे सहाय्यक उपअभियंता डी. जे .कोल्हे यांनी दिली.
तालुक्यात आजपर्यंत देवणी महसूल मंडळात( ५३३) मिमी इतका पाऊस झाला आहे,तर बोरोळ महसूल मंडळात (४४९ ) मिमी इतका पाऊस झाला आहे तर सर्वाधिक पाऊस वलांडी महसूल मंडळात (६९३) मिमी इतका जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे तर काहीं ठिकाणीं पिवळी पडली आहेत.दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या होत असलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनाव-याच्या चा-याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. तालुक्यातील इतर तलावांतील पाणी साठा आकडेवारीत-आनंदवाडी सा.तलाव १०० टक्के, दवण हिप्परगा सा.तलाव ७.०६, लासोना सा.तलाव ८३.४४, अनंतवाडी सा.तलाव २२.६१, बोरोळ सा.तलाव २७.८०, गुरनाळ सा.तलाव २२.५१, वडमुरंबी सा. तलाव ३६.७४, वागदरी सा तलाव ७३.०९, बोंबळी तलाव १००, टाकळी तलाव १०० टक्के असा पाणीसाठा आहे.