नवी दिल्ली : हरियाणात आगामी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आज प्रसिध्द कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही कुस्तीपटूंना काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली असून, त्यांनी होकार दिला तर दोघेही कुस्तीच्या फडातून थेट निवडणुकीच्या फडात उतरलेले पहावयास मिळतील. दरम्यान, या दोघांच्या राहुल गांधींसोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत विनेश आणि बजरंगने राहुल गांधी यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढतील, असे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी आज सकाळी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांची जवळपास १५ मिनिटे भेट घेतली.
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर विनेश आणि बजरंग काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने आतापर्यंत हरियाणातील ९० पैकी ६६ जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. हरियाणातील विधानसभेच्या ५० जागांवर ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून, ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
भूपेंद्र हुडांची विनेश-बजरंगसाठी लॉबिंग
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र हुडांनी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या तिकिटासाठी लॉबिंग केली असून, कुस्तीपटूंच्या पाठीशी उभे राहिल्यास हरियाणातील जनतेचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल, असे हुडा म्हणाले. केंद्रीय निवडणूक समितीने चर्चेनंतर यावर सहमती दर्शवली. मात्र, निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय विनेश आणि बजरंग यांच्यावर सोपवण्यात आला आहे. यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर विनेशने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षात येऊ इच्छिणा-या सर्वांचे आम्ही स्वागत करतो, असे हुडा म्हणाले होते.