23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रशिल्पकार जयदीप आपटेला अटक

शिल्पकार जयदीप आपटेला अटक

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेला पोलिसांनी कल्याण येथील घरातून अटक केल्याचे समजते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी ७ पथके रवाना केली होती.

महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे फरार झाला होता. त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. काल ३ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी आपटेविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. कोणत्याही राष्ट्रीय विमानतळावरून भारताबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी ही नोटीस जारी केली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला त्याच्या कल्याणमधील घरातून ताब्यात घेतले. पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर त्याला दोन आठवड्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले.

महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी या प्रकरणाची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात दुसरा आरोपी जयदीप आपटे गायब होता. त्याचा मोबाईलदेखील बंद असल्याने पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा सापडत नव्हता. मालवण पोलिसांनी ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीसदेखील बजावली होती. मात्र त्यानंतरदेखील तो हजर राहिला नव्हता. या प्रकरणातील अन्य एक आरोपी चेतन पाटील हा कोल्हापूर पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चेतन पाटील याला न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR