नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पेन्शनधारकांसाठी दर महिन्याला पेन्शन मिळविण्यासाठी काही ठराविक बँकेतच गर्दी करावी लागायची. ठराविक तारखेला या बँकांमध्ये पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागायच्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. याचा विचार करून केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता पीएफची पेन्शन आता काही महिन्यांनी कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत घेता येणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.
पीएफची पेन्शन आली की, खेड्यापाड्यातील पेन्शनधारकांना, ज्येष्ठ नागरिकांना शहराची, तालुक्याची वाट धरावी लागते. शहरात काय सहज पैसे काढता येतात. परंतु ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होते. त्यातच पुन्हा बँकांचे लंच टाईम, कागदपत्रांची पूर्तता, जिवंत असल्याचा दाखला आदी कागदपत्रांमुळे ज्येष्ठांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक फे-या करूनच नागरिक बेजार होतात. ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १ जानेवारीपासून आता पेन्शनधारक त्यांच्या जवळच्या कोणत्याही बँकेत त्यांचे खाते काढून त्यात पेन्शन घेऊ शकणार आहे.
ही नवीन प्रणाली आल्याने खाजगी क्षेत्रातील कर्मचा-यांना याचा चांगला फआयदा होणार आहे. यामुळे ईपीएफओच्या ७८ लाख ईपीएस पेन्शनधारकांचा फायदा होणार आहे. सेंट्रलाईज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमची मन्यता हा ईपीएफओच्या आधुनिकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.
केंद्राने दिली मान्यता
निवृत्तीनंतरच्या ईपीएफओच्या ईपीएस पेन्शनमध्ये १ जानेवारी २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाईज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (सीपीपीएस) कडून कर्मचारी पेन्शन योजना १९९५ चा प्रस्ताप प्राप्त झाला होता. यात कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनधारक पेन्शन काढू शकतो, असे प्रस्तावित केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला.