पालघर : प्रतिनिधी
आठवड्याभरापूर्वी पालघरच्या वाडा तालुक्यात एकाच घरात तीन मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आई-वडील आणि मुलगी असे तिघांचे मृतदेह बंद घरात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. आता या प्रकणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, कामानिमित्त गुजरातला राहणा-या मुलाने पालघर येथे घरी जाऊन दरवाजा उघडून पाहिला असता हा सगळा प्रकार समोर आला.
मुलाने वाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला होता. वाडा तालुक्यातील नेहरोली गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. गावात राहणा-या राठोड कुटुंबातील तिघांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आले होते. मुकुंद राठोड हे २५ वर्षांपूर्वी गुजरातमधून पालघर येथे राहण्यासाठी आले होते. मुकुंद यांच्याबरोबर त्यांची पत्नी कांचन राठोड, मुलगी संगीता राठोड, दोन मुले सुहास आणि पंकज राहात होते. काही वर्षांपूर्वी मोठा मुलगा सुहास राठोड हा नोकरी-व्यवसायासाठी गुजरातमध्ये गेला. तर दुसरा मुलगा विरारमध्ये राहात होता.
मात्र १३ दिवसांपासून सुहासचा आई-वडिलांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याने नेहरोली जाण्याचे ठरवले. सुहास गावात पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा हा बंद होता. त्याने दरवाजा उघडला असता त्याला घरातून दुर्गंधी येऊ लागली. सुहासला घरात तिघांचेही मृतदेह पाहून जबर धक्का बसला. सुहासने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला. मात्र तिघांचे मृतदेह पाहून पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असता घरातील पत्र्याच्या पेटीत आई व मुलीचा मृतदेह आढळला. तर वडिलांचा मृतदेह बाथरूमच्या दरवाजात आढळला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. तपासादरम्यान भाडोत्रीने तिघांची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मुकुंद राठोड यांनी गावात एक जागा घेऊन इमारत बांधली होती. त्या इमारतीत त्यांनी भाडेकरूंनाही जागा दिली होती. याच इमारतीत आरिफ हा भाडेकरू म्हणून राहत होता. आरिफ हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.
राठोड यांच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरिफला वाटत होते. त्यामुळे त्याने राठोड यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलीची लोखंडी रॉडने हत्या केली. त्यानंतर पत्र्याच्या बंद पेटीत त्यांचे मृतदेह ठेवले. हा प्रकार घडला तेव्हा मुकुंद राठोड हे घराबाहेर होते. त्यामुळे आरोपी आरिफ घरात बाथरूममध्ये लपून बसून त्यांची वाट पाहत होता. राठोड घरात येताच त्याने बाथरूममधून त्यांच्यावर वार केले. त्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी आरिफ उत्तर प्रदेशला पळून गेला. वाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना केली होती. उत्तर प्रदेशातून पोलिसांनी आरोपी आरिफला अटक केली.