नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राकडून आनंदाची बातमी येत आहे. नीरजने ब्रुसेल्स येथे होणा-या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. वास्तविक, नीरज १४ गुणांसह झुरिच डायमंड लीगनंतर चौथ्या स्थानावर आहे आणि टॉप-६ खेळाडू ब्रसेल्स डायमंड लीगसाठी पात्र ठरले आहेत.
झुरिच डायमंड लीगनंतर नीरज चोप्रा १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स २९ गुणांसह अव्वल स्थानावर तर जर्मनीचा ज्युलियन वेबर २१ गुणांसह दुस-या आणि चेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेज १६ गुणांसह तिस-या स्थानावर राहिला. मोल्दोव्हाचा अँड्रियन माडेर्रे १३ गुण आणि जपानचा रॉडरिक गेन्की डीन १२ गुण हे टॉप-६ मध्ये असलेले इतर खेळाडू आहेत, ज्यांनी ब्रसेल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटरच्या ऐतिहासिक थ्रोसह सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम केवळ ५ गुणांसह बाद झाला.
नीरजकडून हुकले सुवर्णपदक
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय स्टार नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकू शकला नाही. त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले, जिथे तो ६ पैकी फक्त एक थ्रो करू शकला, ज्यामुळे त्याने रौप्यपदकावर दावा केला. अन्यथा, त्याचे उर्वरित ५ थ्रो योग्य नव्हते. भारताला नीरजकडून सुवणार्ची अपेक्षा होती, कारण त्याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकले होते. पण, त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात त्याला यश आले नाही. आता तो आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने ब्रुसेल्समध्ये प्रवेश करेल.