लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात श्री गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असतानाच लातूर जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतींना २०२४-२५ च्या आराखडया नुसार २८ कोटी ४ लाख ५२ हजार रूपयांचा बंधितचा पहिला हप्ता दि. ६ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा परिषदेकडे आला आहे. त्यामुळे जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतींना गणपती बप्पा पावला असून या निधीतून ग्रामपंचायतींच्या विकास कामांना गती येणार आहे.
लातूर जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतींनी २०२४-२५ च्या खर्चाचे आराखडे तयार केले आहेत. या आराखडयांना मंजूरीही जिल्हा परिषदेच्याकडून मिळालेली आहे. या आराखडयानुसार ग्रामपंचातींना शासनाकडून येणारा निधी, अनुदान हे खर्च करणे बंधनकारक आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत ग्रामीण स्थानीक स्वराज्य संस्थांना २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आराखडयानुसार लातूर जिल्हयातील ७८५ ग्रामपंचायतीसाठी २८ कोटी ४ लाख ५२ हजार रूपयांचा बंधित निधीचा पहिला हप्ता लातूर जिल्हा परिषदेच्याकडे प्राप्त झाला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत वितरीत निधीतून ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार आहे.
१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या निधीतून ग्रामपंचायतींना विकास आराखडयानुसार गावातील जलजिवन मिशन मधून राहिलेली कामे, दुरूस्त्या, बरोबरच सांडपाणी, घनकचरा या स्वच्छतेच्या कामावर निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता राखण्यास व पाणी पुरवठयांची कामे करण्यास या निधीचा हातभार लागणार आहे. १५ वा केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्थाच्या बळकटीकरणासाठी निधी जिल्हा परिषद स्तरावर आला असून तो ग्रामपंचायतींना लवकरच वर्ग होणार आहे.