भविष्यात ती नॅचरल होईल : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्याशी केलेली युती नॅचरल युती नव्हती. ती राजकीय युती होती. आजही आमची आणि अजितदादांची युती राजकीय आहे. कदाचित या निवडणुकीत ती थोडी सेटल झाली. पुढील काही निवडणुकांमध्ये आणखी सेटल होईल. पुढील ५-१० वर्ष गेले तर कदाचित त्यांच्यासोबतची युती नॅचरल होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची महायुतीतून एक्झिट वगैरे होणार नाही. आम्ही तिन्ही पक्ष आणि इतर छोटे पक्ष आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुती जी लोकसभेला होती, तीच महायुती विधानसभेला असणार आहे.
अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. अजित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता त्याच अजित पवारांसोबत त्यांनी युती केल्याची टीका विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत अजित पवार , एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागले.
पुतळा कोसळण्याच्या
घटनेचे राजकारण
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे. पुतळा कोसळला त्या घटनेचे ज्या प्रकारे राजकारण केले जाते, ते दुर्दैवी आहे. आपल्या दैवताचे मूर्तीभंजन झाल्यानंतर आपण त्याचे फोटो व्हायरल करतो का? राजकीय फायद्यासाठी फोटो व्हायरल करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
पवारांच्या डोक्यात
ठाकरेंचे नाव नाही
शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे, यासाठी जे तीन-चार चेहरे असतील, त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याला आमदार आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले असून, ठाकरेंचे नाव नसेल तर देवेंद्र फडणवीस यांचेही नाव महायुतीच्या नेत्यांच्या मनात नाही, असा टोला लगावला.