मुंबई : मध्य रेल्वेचा कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प प्रगतिपथावर असून जवळपास ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच कसारा ते इगतपुरीदरम्यान रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या कसारा आणि कर्जत घाटात दररोज दीडशेपेक्षा जास्त गाड्यांची ये-जा होते. अनेक गाड्यांना घाट विभागात तांत्रिक थांबे दिले जातात. त्यामुळे गाड्यांच्या व्यक्तशीरपणावर मोठा परिणाम होतो .
तसेच मध्य रेल्वेच्या कसारा यार्डमधील प्लॅटफॉर्मची लांबी-रुंदी मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांच्या तुलनेत कमी असल्याने एक गाडी निघेपर्यंत मार्गिकेवर थांववले जात होते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत होता. तसेच उपनगरीय लोकल सेवांवरही त्याचा परिणाम दिसून येतोय. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा व्यक्तशीरपणा सुधरवण्यासाठी मध्य रेल्वेने कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पाचे ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी १९.९९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात विविध महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे. डाऊन यार्डवर मार्गिका क्रमांक १, २ आणि ३ रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी ८४४ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
फलाट क्रमांक १ आणि २ चे रुंदीकरण आणि विस्तार करण्यात येणार आहे. अप यार्ड मार्गिका क्र ४, ५, ६ रिसेप्शन आणि डिस्पॅच मार्गिकांची लांबी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी रस्ते उड्डाणपूल तोडून पुनर्बांधणी केली जाणार आहे.