21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयसीरियल किलर महिलांना अटक

सीरियल किलर महिलांना अटक

दोन वर्षांत एकाच पद्धतीने चार जणांचे खून केले

तेनाली : आंध्रप्रदेश पोलिसांनी गुरूवारी तीन सीरियल किलर महिलांना तेनाली जिल्ह्यातून अटक केली. या महिलांनी २०२२ पासून तीन महिला आणि एक पुरुष अशी चार जणांची हत्या केलेली आहे. या महिला अनोळखी लोकांशी आधी मैत्री करत असत. मग त्यांना गुंगीचे औषध मिश्रीत पेय प्यायला देत. समोरचा व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्याकडील मौल्यवान वस्तूंची चोरी करून त्यांची हत्या केली जाई.

जून २०२२ मध्ये सीरियल किलर महिलांनी पहिली हत्या केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिघींना नगुर बी. या महिलेचा पहिला खून केला. त्यानंतर आणखी दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसेबसे वाचले. १३ जून रोजी बंदलमुरी गावातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चौकशी केल्यानंतर मृत महिलेचे नाव नगुर बी. असल्याचे समोर आले. या खूनाचा तपास करत असताना पोलिसांना रजनी, व्यंकटेश्वरी आणि रामनम्मा या तीन महिलांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला.

पोलिसांच्या नोंदीनुसार व्यंकटेश्वरी नामक आरोपी महिला याआधीही काही गुन्ह्यात सामील होती. ३२ वर्षीय व्यंकटेश्वरी तेनाली जिल्ह्यात स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तसेच कंबोडियामध्ये जाऊन सायबर क्राइम सारख्या गुन्ह्यांसाठी तिने काम केले होते. या महिला गुंगीचे औषध म्हणून सायनाइडचा वापर करत असत. एसी दुरुस्त करणा-या एका मित्राकडून त्या सायनाईड मिळवत असत. पोलिसांनी तीनही महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सायनाईड आणि इतर वस्तूंचा साठा जप्त केला आहे.

तेनाली जिल्ह्यातील या कारवाईमुळे केरळमध्ये घडलेल्या सायनाईड प्रकरणाची आठवण होते. तेथील एका महिलेने नव-याच्या कुटुंबातील सहा जणांची १४ वर्षांत सायनाईड देऊन हत्या केली होती. तेनालीचे पोलिस अधीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले की, तीनही महिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्यांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, अनोळखी लोकांशी मैत्री करताना त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR