लातूर : एजाज शेख
नाही, नाही, म्हणाता सत्ताधा-यांनी अखेर लातूरचा मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना रशियाच्या काइनेट कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. रशियाची काइनेट कंपनी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत दि. ३ सप्टेंबर रोजी बोगी कारखान्यात बैठक झाली. या बैठकीत बोगी कारखान्याचा आढावा घेण्यात आला. आता नव्याने सर्व यंत्रणा उभारुन रेल्वे बोगीचे उत्पादन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
लातूरपासून जवळच असलेल्या चिंचोलीराव शिवारात मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना उभारणीचा भाजपा सत्ताधा-यांनी घाट घातला तेव्हापासूनच या रेल्वे बोगी कारखान्याची सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चर्चा झाली. रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना रोजगार देण्यावरुन सत्ताधा-यांमध्येच मतभिन्नता दिसून आली. त्यात शेवटपर्यंत एकवाक्यता आली नाही. तसेच रेल्वे बोगी कारखाना विदेशी कंपनीला दिला जाणार असल्यामुळे विरोधी पक्षांनी त्याविरोधात टिकेची झोड उठवली. परंतु, रेल्वे बोगी कारखाना विदेशी कंपनीला दिला जाणार नाही, असे खुलाशांवर खुलाशे सत्ताधा-यांनी केले. मात्र रेल्वे बोगी कारखाना रशियन कंपनी काइनेटच्या घशात गेलाच.
एक वर्ष नव्हे, सहा वर्षे झाली तरी…
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी म्हणून सन २०१८ मध्ये लातूरपासून जवळच असलेल्या चिंचोलीराव परिसरात मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी एका वर्षात हा कारखाना सुरु होईल, अशी ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली होती. मात्र एक वर्ष तर सोडाच आता सहा वर्षे होत आली तरी या कारखान्यातून एकही रेल्वे बोगी बाहेर पडली नाही.
गेल्या सहा वर्षांत या रेल्वे बोगी कारखाना उभारणीचे काम कासवगतीने सुरु आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमात या कारखान्याचेही उद्घाटन उरकुन घेण्यात आले होते. त्यालाही आता सहा महिने उलटून गेले तरीही या कारखान्यातून रेल्वे बोगीचे उत्पादन सुरु झाले नाही. रशियाची काइनेट कंपनीला हा कारखाना चालविण्यासाठी देण्यात आला आहे. त्यावर रेल्वे विभागाचे नियंत्रण राहिल, असे बोलले जात आहे. परंतू, कारखाना चालविणारी रशियन कंपनी रेल्वे विभागाच्या नियंत्रणात राहिल काय?, हा खरा प्रश्न आहे. या कारखान्यातून १२० वंदेभारत रेल्वेच्या १ हजार ९२० बोगी तयार केल्या जाणार आहेत. या कारखान्यात देशभरातील विविध भागांतून सुटे भाग आणुन बोगी तयार केल्या जाणार आहेत.