पुणे : प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र गणरायाचे शनिवारी दिमाखदार आगमन झाले. आता सर्व महिलांना वेध लागले आहे ते मंगळवारी येणा-या गणपतीच्या बहिणी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या स्वागताचे. यासाठी बाजारपेठ सजली असून महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
शहरातील बाजार पेठेत खणआळी, मोती चौक परिसर विविध विक्रेत्यांच्या साहित्याने बहरले असून साहित्य खरेदीसाठी महिलांचा तितकाच उत्साह दिसत आहे. गौरींना लागणारे विविध दागदागिने खरेदीसाठी तसेच गौरीपुढे मांडण्यात येणा-या विविध फराळ व पदार्थांच्या खरेदीसाठी महिलांची धांदल उडाली आहे.
यामुळे रस्ते महिलांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. काही वर्षांपर्यंत महिला घरोघरी फराळाचे पदार्थ करुन ते गौरीपुढे मांडत असतात. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये विविध तिखट आणि गोड प्रकारचे फराळाचे पदार्थ महिला या छोट्या स्वरूपात पॅकेट वजा तयार मिठाई विक्रेत्यांकडून खरेदी करून त्या गौरीपुढे मांडण्याचा कल वाढला आहे.
लाडू, चिवडा, बर्फी, म्हैसूर पाक, बालुशाही, सुतरफेणी विविध प्रकारचे माव्याचे मोदक, अंबा बर्फी, कलाकंद, गुलाबजाम, लसूण शेव, तिखट शेव, पालक शेव, भावनगरी, गाठी, साखरगाठी, गोड शेव आधी प्रकार येथे पॅकेट स्वरुपात बनवून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वात कमी वजनाच्या असे वीस रुपयाचे प्रत्येकी एक नग असे पाकीट महिला खरेदी करताना दिसत असून गौरीपुढे या फराळाची डिश सजवण्यामध्ये एक विशेष उत्साह दिसून येतो. अनेक गणेश मंडळांनी गौरी पुढे मांडण्यात येणा-या पदार्थांच्या सजावट स्पर्धा ही आयोजित करण्यात आल्या आहेत.