इस्लामाबाद : वृत्तसंस्था
बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानमध्ये लोकक्षोभाचा उद्रेक झाला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी लोकांनी एल्गार पुकारला.
इम्रान खान विविध गुन्ह्याखाली गेल्या एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहेत. खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रविवारी इस्लामाबादमध्ये रॅलीचे आयोजन केले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या वादग्रस्त निवडणुकीनंतर पीटीआयकडून पहिलंच राजकीय शक्तीप्रदर्शन आहे.
‘इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होईपर्यंत आम्ही आराम करणार नाही,’ असे सांगत इम्रान खान यांचे निकटवर्तीय हम्माद अझहर यांनी इरादा स्पष्ट केला आहे. इम्रान खान एकमेव व्यक्ती आहेत जे या देशाला ‘भ्रष्ट आणि अक्षम राजकारण्यांच्या तावडीतून’ वाचवू शकतात, अशी प्रतिक्रिया लाहोरमधील प्रख्यात वकील आणि पीटीआय नेते सलमान अक्रम राजा यांनी दिली.
इस्लामाबाद प्रशासनाकडून संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी शिपिंग कंटेनर आणि दंगलविरोधी पोलिस तैनात करून शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग रोखले.
अल-जझीराने दिलेल्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच पीटीआयला पाकिस्तानी न्यायालयाने इस्लामाबादच्या सीमेवर रॅली काढण्याची परवानगी दिली. परंतु, अधिका-यांनी कंटेनर लावून मार्ग अडवले. ज्यामुळे लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे कठीण झाले.