कोल्हापूर : कागल (जि.कोल्हापूर) येथील अवधूत हरिभाऊ जोशी (वय ३९) यांचा शिरोडा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून अवधूत जोशी यांच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार शिरोडा वेळागर समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी जोशी हे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.
यावेळी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत जोशी हे पूर्ण दिसेनासे झाले होते. यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. मित्रपरिवाराने स्थानिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. याबाबत सिद्धार्थ मधुकर लोखंडे यांनी वेंगुर्ला पोलिसांत खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस गजेंद्र भिसे करत आहेत.