इम्फाळ : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. तथापि, आज राजभवनाकडे मोर्चा काढताना विद्यार्थ्यंची सुरक्षा दलांशी झटापट झाल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. यामुळे काँग्रेसचे खासदार ए. बिमोल अकोइझम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून हिंसाचाराच्या संकटावर तीव्र वेदना व्यक्त केल्या असून, राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, राज्याची राजधानी इम्फाळमध्ये मंगळवारी दुपारी लागू करण्यात आलेला कर्फ्यू आज सकाळीही सुरूच होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून पोलिस कर्मचारी शहरात सतत गस्त घालत आहेत. ते म्हणाले की, परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. मणिपूरमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी राजभवनाकडे मोर्चा काढला होता. यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
राजभवनाकडे जाताना आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सुरक्षा जवानांवर दगड आणि मार्बल फेकले. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असे पोलिसांनी म्हटले आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या संघटनेने दावा केला की, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ५५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावे : राऊत
दरम्यान, सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शहा त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावे. मणिपूर देशाच्या काळजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावे, अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतिन यांच्यासह त्यांच्या घरी बसून चहा पितात. नंतर झेलेन्स्कीला भेटतात, युद्धबंदीवर चर्चा करतात, इस्रायल-गाझापट्टीतील युद्धाविषयी चर्चा करतात मात्र त्यांना मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाही, असा टोलाही राऊत यांनी मोदींना लगावला.