25.5 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ

मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ

भाजप नेत्याचा गंभीर आरोप महायुतीतील वाद चव्हाट्यावर

नागपूर : महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री विदर्भात भाजपपेक्षा महाविकास आघाडी सरकार काळात असलेल्या मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील भाजप नेत्याने केला आहे. यामुळे महायुतीत पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील माजी मंत्रांना साथ देतात, असा अत्यंत गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार कायद्यानुसार आरोपी सुनील केदार आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात दिलीप वळसे वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपच्या श्रेष्ठींना सांगूनही काहीच होत नाही
१२ सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली. त्यामुळे कृषी मंत्री असूनही धनंजय मुंडे यांना शेतक-यांच्या हिताची काळजी नाही, उलट ते आपले पूर्वीचे सहकारी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून काम करत आहेत. भाजपच्या श्रेष्ठींना यासंदर्भात सांगूनही काहीच होत नाही. दिलीप वळसे तर सुनील केदार यांच्या प्रकरणी आमच्या श्रेष्ठींचाही ऐकत नाही, असे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. आता यावर धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR