छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील येत्या १७ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत मध्यरात्री १२ वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना या निवडणुकीत ओबीसीची ताकद दिसेल, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरागेंचं उपोषण सुरू होताच, आपणही उपोषण सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील, त्याच्या दुस-या दिवशी, त्याच ठिकाणी ओबीसीचे उपोषण सुरू झालेले दिसेल असे लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांना त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच ताकदीने ओबीसी देखील उत्तर देतील. नुसत्या मराठवाड्यात २५ आमदार ओबीसींकडून पाडण्यात येणार आहेत. आमच्याकडे त्या २५ आमदारांची यादीही तयार आहे. त्यामुळेच आता काही आमदार निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेत उतरू लागले, असा गौप्यस्फोटही लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागणार
या विधानसभेला शरद पवार, एकनाथ शिंदे, काँग्रेस यांना ओबीसी मोठा दणका देणार आहेत. जे नेते मनोज जरांगे यांना भेटलेत, त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना निवडणुकीत ओबीसी धूळ चालणार आहे असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्या दबावाखाली वाटेल ते मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून यातील एकही मागणी कायद्याच्या चौकटीत टिकणारी नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले होते की, आमच्या मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी उपोषण करत आहे. मराठा समाजाचे मुलं मोठी झाली पाहिजे. यासाठी मी १७ तारखेपासून म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे. कोणीही आपले काम सोडून आंतरवालीकडे येऊ नये, मी १६ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे.