16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार

महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार

पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

गोंदिया : प्रतिनिधी
हे भ्रष्ट सरकार, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खावेसे वाटतात या सरकारला घालवावं लागेल. जनतेचा निर्धार पाहिला तर संपूर्ण विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रात जर तुम्ही सत्तांतर केले, हरियाणात सत्तांतर होणार आहे त्यामुळे केंद्र सरकार फार दिवस टिकणार नाही. मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गोपाल अग्रवाल यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते.

गोंदिया येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक प्रश्न आहेत, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, शेतक-यांच्या आत्महत्या, संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत. यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद, या विधानसभेच्या निवडणुकीतही नेत्रदीपक कामगिरी होईल याबद्दल मला काही चिंता नाही. भंडारा-गोंदिया परिसरात नानाभाऊंचे काम हलके झाले. ते राज्यभरात फिरू शकतात आणि या दोन्ही जिल्ह्यांत गोपाल अग्रवाल हे मविआच्या आणि काँग्रेसच्या सर्व जागा जिंकून आणतील ही जबाबदारी त्यांची राहील. मी मुख्यमंत्री असताना गोपाल अग्रवाल यांच्यासोबत काम केले आहे. २४ तास गोंदिया मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास, मग विधिमंडळाच्या भाषणातून, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून, मंत्र्यांकडून कामे करून घेण्याची इतकी चिकाटी मी कधी पाहिली नाही. ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते, तिथेही चांगली कामगिरी केली असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुढच्या काळात अनेकजण काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. दररोज एक-एक नवीन कार्यक्रम होणार आहे. भाजपाचे खरे रूप पाहिलेले आता तिथे राहणार नाहीत. आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आल्यापासून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य भरलेले आहे. नाना पटेल यांना संपूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन काँग्रेसमध्ये स्फूर्ती आणली आहे.

लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला ६५ टक्के जागा दिल्या. ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. आता त्यापेक्षाही जास्त जागा विधानसभेला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. महायुतीत कोण राहील किंवा कोण जाईल हे मला माहिती नाही, पण महायुतीला १०० जागाही मिळणार नाहीत. गेली १० वर्षे चालत आलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने येथे आलात असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR