शिंदे गटाच्या शिवसेनेची पदाधिका-यांवर कारवाई
ठाणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिका-यांनी ढोल वाजविणा-यांवर नोटांची उधळण केली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून विरोधकांनी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित शिवसेना पदाधिका-यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली.
तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी संबंधित नोटा उधळणा-या पदाधिका-यांची हकालपट्टी केली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने पत्रक जारी करण्यात आले असून दोन शिवसेना पदाधिका-यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने ते पत्र जारी करण्यात आले.
ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे आनंदाश्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. या आनंद आश्रमाच्या एका खोलीत आनंद दिघे यांचे वास्तव्य होते. मात्र, शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विरोधकांनीही शिंदे गटावर टीका करायला सुरुवात केली होती.