वडीगोद्री – विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महायुतीच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता दिसत आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर १७ सप्टेंबरपासून अन्न-पाण्याचा त्याग करत बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या आगामी दौ-याच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा होत आहे. रविवारी सकाळी खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली.
संदिपान भुमरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला वाटते १७ तारखेपर्यंत गॅझेट जर लागू केले, तर मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी मराठ्यांचा एक आनंदाचा दिवस उगवू शकतो. आपण हे काम तातडीने करावे हेच भुमरे साहेबांना सांगितले. समाजाशी दगाफटका करू नका. एक वर्षापासून गोरगरिबांचे आंदोलन सुरू आहे.
चर्चा हीच झाली की मराठा समाजाचे एक वर्षापासून जे विषय आहेत, सगेसोयरेची अंमलबजावणी आणि ८३ क्रमांकाला मराठा-कुणबी एकच आहेत. शंभुराजेंनी समिती पाठवली होती. तिच्या माध्यमातून ८ हजार पुरावे सापडले आहेत. सगेसोयरेच्या बाबतीत थोडे राहिले आहे, अशी माहिती भुमरे यांनी बैठकीनंतर दिली.
जरांगे पाटील यांच्यासोबतच्या भेटीबद्दल बोलताना भुमरे म्हणाले, उद्या मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही टाकणार आहोत, लवकर समाजाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री सांगतील, मी सांगण्यापेक्षा. उद्या मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री आपल्याला सांगतील लवकरात लवकर निर्णय व्हावा असे मला वाटते.