कोल्हापूर : प्रतिनिधी
बदलापूर अन् कोलकाता येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात देखील एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणा-या नऊवर्षीय चिमुकलीवर ७३ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर हादरून गेले असून, राज्यात महिला आणि चिमुकलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये ७३ वर्षीय श्रीपती भोसले याआरोपींने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या ७३ वर्षीय नराधमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर लैंगीक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण जगभरात गाजत आहे. तर बदलापूरच्या घटनामुळे देखील मोठा जनआक्रोश पहावयास मिळाला होता. या घटनेमुळे राज्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर देखील राज्यातील विविध जिल्ह्यात लैंगीक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता कोल्हापूरमधील मधील या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.