कोल्हापूर : प्रतिनिधी
सर्वधर्म समभाव या संविधानाच्या शिकवणीवर घाला घालण्याचे काम कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. येथे अल्पसंख्यांकांच्या बाबतीत दुजाभाव केल्याचा प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीने तुघलकी ठराव घेतला. मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, तसे केल्यास ग्रामपंचायतीने आक्षेप घ्यावा, असा ठराव या ग्रामपंचायतीने केला. या ठरावामुळे संविधान पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ठरावाचे पत्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. राज्यभरातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. नागरिकांचा संताप लक्षात घेता ग्रामपंचायतीने घुमजाव करत दिलगिरी व्यक्त केली. काहीजण जाणीवपूर्वक सामाजिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सरपंच स्मिता पाटील यांनी केला. दरम्यान, काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनीही नाराजी व्यक्त केली . ठरावावर नव्हे तर संविधानावर विश्वास असल्याचे पटेलांनी म्हटले आहे.
शिंगणापूर गावाच्या हद्दीमध्ये नवीन नोंदणी करत असताना अल्पसंख्यांक ( मुस्लिम ) याचे नवीन मतदान नोंदणीत नावे समाविष्ट करण्यात येवू नये असे सर्वानुमते ठरले.तसेच ज्या ज्या वेळी नवीन नावे प्रसिद्ध होतील त्या त्यावेळी अल्पसंख्यांक (मुस्लिम) यांची नावे समाविष्ट झाली असल्यास त्यावर ग्रामपंचायतीने हरकती घेऊन सदरची नावे कमी करण्यात यावीत असे सर्वानुमते ठरल्याचे ठरावात नमूद आहे. प्रमोद संभाजी मस्कर हे या ठरावाचे सूचक होते. तर अमर हिंदुराव पाटील यांनी याला अनुमोदन दिले.
पण प्रत्यक्षात ठरावातील भाषा मात्र चुकीचे असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम मतदार नोंदणी हा विषय क्रमांक २ म्हणून मांडण्यात आला होता. ठराव क्रमांक २९ नुसार, मौजे शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वरील विषयावर सविस्तर चर्चा झाली.
टीकेनंतर आता अजब दावा
ठरावांमध्ये प्रत्यक्षात अल्पसंख्यांक मुस्लिम मतदारांची नावे आल्यास तात्काळ ग्रामपंचायत ने हरकती घ्याव्यात असे म्हटले आहे. पण शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता पाटील यांनी मात्र ठरावाचा चुकीचा अर्थ लावल्याचा अजब दावा केला.
सरपंचांकडून घुमजाव
शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच स्मिता पाटील यांनी मात्र लगेच घुमजाव करत शेजारील नागदेववाडी मध्ये दोन बांगलादेशी मुस्लिम महिला बेकायदेशीर रित्या वास्तव्यास होत्या, त्यामुळे अशा प्रकारचा ठराव केल्याचे स्पष्टीकरण देत केलेल्या ठरावाबाबत दिलगिरी व्यक्त केलीय. आपण केलेला ठरावा संदर्भात काहीजण जाणीवपूर्वक दिशाभूल करून सामाजिक धड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप केला.