लातूर : प्रतिनिधी
श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिवणुकीची जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी निघणा-या विसर्जन मिवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलिस अधिकारी, अमलदार तैनात करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील ३ हजार २२५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात जवळपास १ हजार ३२८ गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे. आज मंगळवारी दि.१७ सप्टेंबरला श्री गणरायाच्या मुर्तिचे विसर्जन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर पोलीस प्रशासनही सज्ज आहे . एकूण १ हजार २३८ गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुक काळात लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस पथके, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्र, तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅम-यांची व ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे. श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली असून, १५ ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात १२० पोलीस अधिकारी,१२५० पोलीस अंमलदार, त्यांच्या मदतीला ९५० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगा काबू पथकाचे ४ प्लाटून, तसेच शिघ्रकृती दलाचे २ पथक तैनात करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील ३ हजार २२५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली असून एकंदरीत यंदाचे गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद मिरवणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. गणेश मंडळांनी व ईद-ए-मिलाद निमित्त निघणा-या मिरवणुका मध्ये निर्बंधीत डॉल्बी व लेझर बीमचा उपयोग करू नये असे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. मिरवणुकीसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी-अंमलदार यांचे कडून मिरवणुकीच्या अगोदर आणि मिरवणूक चालू असताना अशा दोन्ही वेळी ध्वनी चाचणी घेण्यात येणार असून त्याबाबत दोषी आढळणारे मंडळाचे पदाधिकारी यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.