मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. अशातच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या महिला मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नावे समोर आणली आहेत.
दरम्यान, राज्य विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत. पण राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्याला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, अशाही चर्चा अनेकदा होत असतात. खासदार वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणा-या महिला आहेत. शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे, सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे रश्मी ठाकरे आहेत. आमच्या पक्षाकडेही महिला आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात.
महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळख आहे. महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिले आहे. पण भाजपकडे बघा, भाजपमध्ये महिलांना मंत्रिपदही दिले जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.