23.4 C
Latur
Sunday, November 10, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीआय चौकशीला पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचा विरोध

सीबीआय चौकशीला पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांचा विरोध

- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण - कोणतीही तक्रार नसल्याचे केले स्पष्ट

मुंबई : प्रतिनिधी
पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला. फेब्रुवारी २०२१ मध्ये पुण्यातील पूजा चव्हाण हिचा तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला.

त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करून त्या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी, अशी मागणी केली. मात्र या प्रकरणी आपली कोणतीच तक्रार नसल्याचा दावा पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी दिवंगत पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणात आपली कोणतीही तक्रार नाही. सीबीआय चौकशी करण्याची आपली कोणती मागणी नसल्याचे त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ आणि पुणे पोलिसांची बाजू मांडणारे उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकादारांच्या मागणीला विरोध केला. याप्रकरणी महानगर दंडाधिकारी यांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेकदा फेटाळून लावल्याच्या बाबीकडे त्यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.

पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी नोंदवलेल्या अपघाती मृत्यूच्या नोंदीला पूजाच्या वडिलांचा विरोध नाही. मग चित्रा वाघ यांनी ही याचिका दाखल करण्यामध्ये त्यांचा काय हेतू आहे, असा प्रश्न पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांची बाजू मांडणारे वकील प्रणव बडेका यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. पूजाचे वडील तसेच तिच्या चारही बहिणींना पुणे पोलिसांबद्दल आणि त्यांच्या तपासाबद्दल या प्रकरणात काही आक्षेप नाही. असे असताना हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची काय गरज आहे, असा प्रश्न वकील बडेका यांनी उपस्थित केला.

मृत्यूसमयी पूजा गरोदर?
चित्रा वाघ यांची बाजू मांडणारे वकील अनिल साखरे यांनी याप्रकरणी काही क्लिप्स न्यायालयासमोर सादर केल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामध्ये पूजा आणि राज्याच्या राजकारणातील उच्चपदस्थ व्यक्तीमध्ये काहीतरी घडत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मृत्यूसमयी पूजा गरोदर असल्याची चर्चा असल्याने तिच्या आत्महत्या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR