मुंबई : राष्ट्रीय तटीय अभियानांतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आज प्रशासनाकडून जुहू चौपाटीवर राबवण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आणि साफसफाई केली आणि राज्यातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देखील उपस्थित होते.
समुद्रकिनारे स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय, महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते.