27.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सव संपला तरी अनेकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळेना

गणेशोत्सव संपला तरी अनेकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळेना

सरकारच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप

छ. संभाजीनगर : गोरगरिबांना गौरी-गणपतीचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी राज्य शासनाने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचे जाहीर केले होते. परंतु, गणेशोत्सव संपला तरी आनंदाचा शिधा जिल्ह्यात पोहोचलेलाच नाही. काही ठिकाणी रवा आहे, तर साखर नाही, गोडेतेल आहे तर चणाडाळ नाही.

गणेशोत्सवात शिधा न मिळाल्याने अल्पउत्पन्न असणा-या लाभार्थ्यांना मात्र खूपच त्रास सहन करावा लागला, यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांमध्ये सरकारच्या भोंगळ कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

ज्यांचे उत्पन्न कमी आहे, अशी कुटुंबे ‘आनंदाचा शिधा’ कधी वाटप होणार याकडे डोळे लावून बसले होती. १०० रुपयांत उपयोगी चार जिनसा मिळणार आहेत. यामुळे काहीप्रमाणात आर्थिक भार कमी होईल, असे या लोकांचे म्हणणे होते. परंतु तसे झालेच नाही. अखेर बाजारातून जादा किमतीमध्ये या जिनसा विकत घ्याव्या लागल्या.

रवा, चणाडाळ, गोडेतेल, साखर हे दिले जाणार आहे. गणेशोत्सव सुरू होईपर्यंत जिल्ह्यातील चारही जिनसा दुकानदारांना वाटप झाल्या नाहीत. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळाला नाही. सणाचे दिवस संपल्यानंतर आनंदाचा शिधा वाटपाची ही परंपरा रायगड जिल्ह्यात मागील दोन वर्षे सुरू आहे. सणाचे दिवस संपल्यानंतर लोक शिधा घेण्यासाठी जात नाहीत, त्यामुळे शिधा कीटच्या वाटपाचे उद्दिष्ट गाठता येत नाही.

लाभार्थ्यांपर्यंत धान्य किंवा त्यातील काही वस्तू न पोहोचवता त्या वस्तूंची खुल्या बाजारात विक्री करायची, असे उद्योग चालवले जात आहेत. यास सरकारी यंत्रणाही तितकीच जबाबदार असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. रेशनवरील धान्य वितरणात सुसूत्रता यावी यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत असला तरी, त्यातून होणारे गैरप्रकार अद्याप तसेच होत असल्याचे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

रास्त भाव धान्य दुकानातून धान्य घेणा-­या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने अशा षडयंत्राच्या विरोधात लढण्याचा ते अजीबात प्रयत्न करीत नाहीत. याचाच गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी रेशन दुकानदार लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत असत. आधुनिक तंत्राचा वापर करीत दुकानदारांवर अनेक निर्बंध आणण्यात आले: परंतु वरिष्ठ स्तरावर होणारे गैरप्रकार तसेच आहेत. जे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या कल्पनेपलिकडचे आहेत.

‘सण संपल्यानंतर शिधा’ची परंपरा
सणाचे दिवस संपल्यानंतर लोक शिधा घेण्यासाठी जात नाहीत, त्यामुळे शिधा कीटच्या वाटपाचे उद्दिष्ट गाठता येत नाही. परिणामी जिल्ह्यात मागणी होणा-­या कीटची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR