पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, उपस्थित होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत-महापुरुषांच्या ग्रंथांनी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तिमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारक-यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरिता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले
येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून कामे करण्यात येतील. मुंबई- बंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे नमूद केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वारीचे महत्त्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता वर्षानुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करून वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहोचू न शकणारे भाविक आपापल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे.
वारक-यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, रस्ते रुंद झाले पाहिजेत, पालखी मार्ग वेगळा करून त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोयी असल्या पाहिजेत यादृष्टीने काम होत आहे. वारक-यांना पालखी तळावरही विविध सोयी-सुविधा देण्याकरिता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.