परभणी/लातूर : परभणी शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झालाय, एकच तास झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. यंदा महानगरपालिकेकडून नालेसफाई केली नसल्याने सातत्याने परभणी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झालंय. आज पुन्हा एकदा याच ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. ज्यामुळे परभणीकडून वसमतकडे जाणारी आणि वसमतकडून परभणीकडे येणारी वाहतूक मंदावली आहे.
परभणी जिल्ह्यातील विविध भागात आज वादळी वारे विजासह पाऊस झालाय. गंगाखेड तालुक्यात तर विजांचे तांडव पाहायला मिळाले. तालुक्यात 4 ठिकाणी वीज कोसळून 8 ते 10 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. शिवाय एका महिला यामध्ये गंभीररित्या जखमी झाली आहे.
गुडेवाडी,घटांग्रा,तांदुळवाडी,इळेगाव येथे वीज कोसळून दोन बैल, दोन म्हैस व सहा शेळ्या दगावल्या असून एक महिला जखमी झाली आहे. तर शहरापासून जवळच असलेल्या मन्नाथ तलाव परिसरात मासेमारी करणाऱ्या महिलेच्या झोपडीवर वीज कोसळून संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे. इळेगाव येथील जखमी झालेल्या जयश्री बैकरे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी
लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. औसा परिसरात तुफान पाऊस झालाय. दरम्यान, काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसलाय. सोयाबीनच्या अनेक बनीम गेल्या वाहून गेल्या आहेत. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात अनेक भागात पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरींनी हजेरी लावली होती. सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी पावसाची हजेरी होती. दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती. मात्र संध्याकाळच्या सुमारास औसा परिसरातील उजनी, टाका…मासूर्डी..तुंगी …तुंगी बुद्रुक… या भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. उजनी अनेक घरात पाणी शिरले आहे.