नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो. तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो. वेळ आल्यास माझं मंत्रिपदही तुम्हाला देईन. फक्त तुम्ही आमच्यासोबत या, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली. रामदास आठवले आज नागपुरात होते.
एवढ्या निवडणुका लढवूनही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता एनडीएत यावे. त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी मदत करेल. नाही तर माझं मंत्रिपदही मी त्यांना द्यायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर ते आतापर्यंत उपमुख्यमंत्री बनू शकले असते, असे रामदास आठवले म्हणाले.
आम्ही दोघे एकत्र असतो तर त्याचा मोठा फायदा झाला असता. त्यांनी माझ्यासोबत यायला पाहिजे. त्यामुळे बहुजन एकत्रित येतील. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे. त्यांनी सोबत यायला पाहिजे. एकटे राहून सत्तेत येता येत नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाचे एकीकरण करण्यासाठी सगळ्या गटांनी एकत्रित येण्याची गरज आहे. फक्त एकट्याने किंवा दोघांनी येऊन चालणार नाही. प्रकाश आंबेडकर जर पुढाकार घेत असतील तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार नाही. माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकीकृत रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं. माझा त्यांना पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.