पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील लोकांची निषेध करण्याची त-हा वेगळी आहे. याचीच प्रचिती पुन्हा आली. पुणे जिह्यातील ३२ गावांमध्ये ‘गाव विकणे आहे’ अशा मजकुराचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे एकाच चर्चेला तोंड फुटले आहे. गावक-यांनी असे बॅनर का लावले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुण्यात सध्या याच विषयाची चर्चा आहे.
गावक-यांनी लावलेल्या बॅनरवरून दिसतंय की, गावकरी पुणे महानगरपालिकेवर नाराज आहेत. बॅनरवर असं लिहिण्यात आलंय की, पुणे महानगरपालिकेचा जुलमी कर भरू शकत नाहीत. याचा अर्थ पालिकेकडून आकारल्या जाणा-या करामुळे ते संतापले आहेत. याच रागातून त्यांनी आपली ३२ गावे विकायला काढली आहेत.
पुण्यातील धायरी, न-हे, आंबेगाव, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे अशा ३२ गावांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. या गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश झालेला आहे. पण, इथे विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. आम्ही पालिकेचा जुलमी कर भरू शकत नाही, त्यामुळे महापालिकेने आम्हाला विकत घ्यावे, अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
पुणे महापालिकेचा निषेध म्हणून गावक-यांनी ठिकठिकाणी असे बॅनर लावले आहेत. पुणे महापालिका आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवत नाही. पण, टॅक्स मात्र भरमसाठ आकारला जातो. आमची कर भरण्याची क्षमता नाही. त्यामुळे आमचे सर्व गावच विकत घ्या,अशी उद्विग्न भावना गावक-यांची झाली आहे.
गावक-यांनी पुणे महापालिकेचा निषेध म्हणून हे बॅनर लावले आहेत. पालिकेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन काही पाऊलं उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे. या ३२ गावच्या गावक-यांनी स्थापन केलेली समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे यावर पुणे महापालिका कसा प्रतिसाद देते हे पाहावे लागणार आहे.