धारणी : प्रतिनिधी
तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ नाल्यात ओव्हर स्पीड खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने १२ जण ठार झाले. सहा शिक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी चार शिक्षक महिला आहेत. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खाजगी बस मधून प्रवास करीत होते. या बसमध्ये ५० प्रवासी होते. यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अमरावतीहून सकाळी सव्वा पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचली. तेथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या घाटवळणाच्या रस्त्यांवर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली. आठच्या सुमारास ती बस सेंमाडोह गावाजवळील नाल्यात कोसळली.
त्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांच्यासुद्धा मृतकांमध्ये समावेश आहे. मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. जखमींवर धारणी तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.