नागपूर : प्रतिनिधी
नागपूर इथल्या काँग्रेस आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा, अशी कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली आहे. आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे सांगताच, बैठकीत कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
नागपूर इथे काँग्रेसचे आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा, अशी कार्यकर्त्यांनी बाजू लागून धरली. आमदार विकास ठाकरे यांनी, नाना पटोलेंना काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला अच्छे दिन आणून दिले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ते पद हिसकावून घेऊ, असे म्हणत खळबळ उडवून दिली. प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ्य बसणार नाही, असे म्हटले आहे.
काही उत्साही कार्यकर्ते असतात : थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हा महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेऊ, असे म्हटले. काही उत्साही कार्यकर्ते असतात, ते निरनिराळी नावे घेत असतात, ती मान्य करण्याचे काही कारण नाही. हिसकावून घेण्याची आणि स्वस्थ न बसण्याची भाषा म्हणजे, ते उत्साही कार्यकर्ते आहेत. ते सर्वच पक्षात असतात, आणि ते असायला देखील हवेत , असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
हायकमांड न्याय करेल : आमदार विकास ठाकरे
प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की, त्याच्या जिल्ह्यातील किंवा भागातील माणूस मुख्यमंत्री व्हावा, नाना पटोले विदर्भाचे नेते आहेत. त्यांची मेहनत आहे. विदर्भातून काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या, तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच असेल. यासाठी राहुल गांधी यांना आम्ही सगळे विदर्भातील कार्यकर्ते साकडे घालू. नानाभाऊसाठी मुख्यमंत्री खेचून आणू. काँग्रेसमध्ये सर्वच सक्षम नेते आहेत. या स्पर्धेत विदर्भातील जनतेने जास्त जागा दिल्या, तर विदर्भातील जनतेचा हक्क आहे. विदर्भ नंबर वन असला, तर यावर हायकमांड सुद्धा न्याय करेल. असे विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीनंतर निर्णय : चेन्नीथला
भाजपला सत्तेतून हटवणे हेच महाविकास आघाडीचे लक्ष आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेह-याबाबत आता निवडणुकीनंतरच निर्णय होईल, अशा शब्दांत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.
हिसकावून घेण्याची भाषेने पटोले अडचणीत : संजय राऊत
विदर्भातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षात अशाप्रकारची भूमिका असेल तर त्यासंदर्भात त्यांचे जे हायकमांड आहेत. राहुल गांधीकिंवा मल्लिकार्जुन खर्गे ते त्या संदर्भात निर्णय घेतील. हिसकावून घेऊ असं काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते बोलत असतील तर ते नाना पटोले यांच्या प्रतिमेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून अडचणीत आणणारे आहे. नाना पटोले काँग्रेस पक्षाचे संयमी आणि निस्वार्थी नेते आहेत. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याच काम करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.