16.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

कोल्हापूर : प्रतिनिधी
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नाशिक, बीड, बारामती, कोल्हापूर याठिकाणी धनगर समाजाने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी बीडच्या परळीमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे. परळी -गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर इटके कॉर्नरवर रास्ता रोको करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालाय. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे. सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास महायुतीचे सरकार येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीड – लातूर महामार्गावर धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरल्याने जवळपास एक तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर समाजाला सरकार वारंवार फक्त आश्वासन देत असून एसटीमध्ये समावेशाच्या आश्वासनाची पूर्तता करत नसल्याने या ठिकाणचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सरकारने यावर गांभीर्याने विचार न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे.

नाशकात रास्ता रोको आंदोलन
नाशिकमध्ये धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आदिवासीमधून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ पुणे -नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

कोल्हपुरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापूरातील पुणे- बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

बारामतीत शेळ्या- मेंढ्या रस्त्यावर
बारामती सोनगाव रस्त्यावर धनगर समाजाच्या वतीने झारगडवाडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनामध्ये शेळ्या- मेंढ्या रस्त्यावर आणत काही काळ रास्तारोको करण्यात आला.

पंढरपुरात रास्तारोको

धनगर समाजाने आज राज्यव्यापी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार पंढरपूर – कराड मार्गावर धनगर बांधवानी शेळ्या मेंढ्या घेऊन रास्तारोको आंदोलन केले. सरकारने धनगड दाखले रद्द करून तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी हे रास्तारोको करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR