मुंबई : वृत्तसंस्था
तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील लाडू भेसळीमुळे चर्चेत आले असतानाच आता सिद्धिविनायक मंदिराचे प्रसादाचे लाडू देखील चर्चेत आले आहेत. मंदिरात मिळणारे प्रसादाचे लाडू उंदिर खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणा-या लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. तर मोठ्या प्रमाणात लाडूचे पॅकेट कुरतडून लाडू खाल्ले आहेत. याचा व्हिडीओ ‘एनडीटीव्ही मराठी’च्या हाती लागला आहे. मंदिर प्रशासन अशाप्रकारे भाविकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे का? असा सवाल भाविक विचारत आहेत.
गणपती बाप्पांचे वाहन उंदिर आहे, पण याच उदरांनी सिद्धिविनायक मंदिरात हैदोस घातला आहे. हा हैदोस इतका की थेट प्रसादात उंदिर दिसू लागले आहेत. इतकी चोख व्यवस्था असलेल्या आणि गर्भश्रीमंत असलेल्या मंदिरात कोणाचे याकडे लक्ष आहे की नाही? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिद्धिविनायक मंदिर प्रशासन करत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.
सिद्धीविनायक गणपती मंदिरात सामान्य नागरिक ते सेलिब्रिटींची रीघ लागलेली असते. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक येथे येतात. आणि घरी जाताना प्रसाद म्हणून सिद्धिविनायक मंदिरात मिळणारा प्रसादाचा लाडू आवर्जून नेतात.