धुळे : गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ वाटप केले जातात. मात्र रेशनमध्ये येणारे धान्य चांगल्या दर्जाचे नसल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. यात रेशनमध्ये आलेल्या तांदळात प्लास्टिक मिश्रित तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे समोर आला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या थाळनेर येथील रेशन दुकानातून प्लास्टिकचे दाणे मिश्रित तांदळाची वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, नागरिकांना हा प्लास्टिक मिश्रित तांदळाचा भात खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास देखील झाला आहे. त्यानंतर नागरिकांनी हा सर्व प्रकार गावच्या सरपंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरपंचांनी संबंधित रेशन दुकानात जाऊन स्वत: पाहणी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
चौकशीची मागणी
सदरचे तांदूळ जाळले असता प्लास्टिकप्रमाणे हा तांदूळ एकमेकाला चिकटून त्याचा कोळसा झाला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी सरपंचांनी लावला आहे. संबंधित रेशन दुकानात हा तांदूळ कसा आला आणि या प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ कुणी केली? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांसह थाळनेर येथील सरपंचांनी केला आहे.