नवी दिल्ली : बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. एन्काऊंटरनंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने आता सीआयडीकडून एन्काऊंटरचा तपास होणार आहे. या प्रकरणात न्यायालयीन पातळीवर आणखी एक घडामोड घडली आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठसमोर सुनावणी झाली. बचपन बचाओ आंदोलन या ‘एनजीओ’ने ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने देशातील सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश देत बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा असे कोर्टाने म्हटले आहे. मुलांची सुरक्षा ही शाळांची जबाबदारी आहे, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे. हे आदेश सर्व राज्यांना लागू असणार आहेत. मुख्य सचिवांना याबाबत कोर्टाने सूचित केलेले आहे.
संजय शिंदे हे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, ज्यांचे नाव देशातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्टमध्ये घेतले जाते. संजय शिंदे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता यामुळे या प्रकरणात त्यांचे महत्त्व वाढले आहे. वर्ष २०१४ मध्ये खूनाच्या आरोपी विजय पालांडेच्या फरार होण्याच्या घटनेनंतर संजय शिंदे यांचे निलंबन झाले होते. परंतु ते पुन्हा सेवेत रुजू झाले. याशिवाय, त्यांनी इक्बाल कासकरला अटक करण्याचे धाडसाचे काम केले होते.