31.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeलातूरचित्रपटामध्ये काल्पनिकतेपेक्षा वास्तव महत्वाचे 

चित्रपटामध्ये काल्पनिकतेपेक्षा वास्तव महत्वाचे 

लातूर : प्रतिनिधी
आपल्या प्रेक्षकांना व्यावसायिक सिनेमाच्या माध्यमातून काल्पनिक जग बघण्याची इतकी सवय झाली आहे की वास्तववादी सिनेमाला ते वेगळा सिनेमा म्हणायला लागतात. दक्षिणेकडच्या सिनेमांमध्ये स्थानिक विषय खुप प्रभावीपणे मांडले जात आहेत. असाच आपला भवताल मुख्य सिनेमाच्या धारेत यावा, या उद्देशाने ‘कस्तुरी’ या सिनेमाची निर्मिती केल्याचे मत दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी व्यक्त केले.
येथील अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने खास लातूरकरांसाठी ‘कस्तुरी’ चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनोद कांबळे यांनी सिनेरसिकांशी संवाद  साधला. कनिष्ठ समजली जाणारी सफाईची कामे करणारा गोपी आपल्या कपड्यांचा वास घालवू शकेल अशा ‘कस्तुरी’च्या शोधात आहे. त्याच्या दृष्टीकोनातून सफाई कर्मचा-यांचे जीवनमान या सिनेमात अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडले गेले असून या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  बार्शीसारख्या ग्रामीण भागात मर्यादीत बजेटमध्ये हा सिनेमा बनला असून त्यातला व्यापक आशय सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी अनुराग कश्यप आणि नागराज मंजूळे ही सिनेमासृष्टीतील मोठी नावे या सिनेमाशी जोडली गेली, असेही कांबळे म्हणाले. अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने ‘कस्तुरी’चे विशेष स्क्रिनिंग लातुरात केले गेले. यावेळी सिनेमातला मुख्य कलाकार समर्थ सोनवणे, कुणाल पवार, आकाश बनसोडे, अनिल कांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र पाटील यांनी केले. सुत्रसंचालन आदित्य कुलकर्णी यांनी केले. डॉ. स्वप्नील देशमुख यांनी आभार मानले. यावेळी अभिजात फिल्म सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, अभिषेक बुचके, डॉ. दुर्गा शर्मा, प्रथमेश जाधव, देवयानी बागल, शिवम मठपती, श्रावणी कुलकर्णी, शिवानी गिराम यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR