नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेच्या तयारीला लागले असून, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघांपर्यंत पोहोचत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, अजित पवार गटाला छेद देण्याच्या दृष्टीने आखणी केली जात आहे. त्यादृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी मतदारसंघात थेट धर्मराजबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे तेथे भाग्यश्री आत्राम वडिलांविरोधात दंड थोपटणार आहेत. दिंडोरी मतदारसंघातही तोच पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अजित पवार गटात आहेत तर त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. याबाबत खुद्द नरहरी झिरवळ यांनी माझा मुलगा माझ्यासोबत असल्याचे सांगितले. परंतु गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता दिंडोरीतही आत्राम पॅटर्न राबविला जाण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार गटाकडून नरहरी झिरवळ मैदानात उतरल्यास त्यांच्या विरोधात शरद पवार गट गोकुळ झिरवळ या तरुण चेह-याला मैदानात उतरवू शकतो. त्यामुळे मुलगा आणि पिता यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
सिंदखेडराजामध्ये काका-पुतण्यात लढाई?
सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे अजित पवार गटाची त्यांनाच उमेदवारी मिळू शकते. परंतु त्यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे विधानसभेच्या तयारीला लागली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीही मागितली आहे. त्यामुळे सिंदखेडराजामध्ये काका-पुतणी यांच्यात लढत अटळ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अजित पवार गटाची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. गायत्री शिंदे विधानसभा लढण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत.