मानवत :
अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मानवत पोलीस ठाणे हद्दीतील झरी शिवारात सायंकाळी साडेचार च्या सुमारास घडली. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळण्यासाठी तब्बल साडेचार तासाचा वेळ जावा लागला.
मानवत शहर व परिसरात २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह व विजांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात झरी येथील
दिगंबर किशोरराव सत्वधर वय २९ वर्षे व संतोष झांबरे वय २८ (परराज्यातील) हे दोघे झरी शिवारातीलच बालाजी रतकंठवार यांचे शेतात बैल चालण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते बैलांना बाजूला सोडून निवाऱ्यासाठी एका झाडाखाली जाऊन थांबले.
याच वेळी एक विज कडकडून त्यांच्या अंगावर पडली व यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत बैल चारण्यास गेलेले दोघेही परत न आल्याने गावात याची चर्चा सुरू झाली. रात्री त्यांचा शोध घेणे सुरू झाले. या शोध मोहिमेत दोघेही शेतात एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने मृत्यू पावल्याचे लक्षात आले. घटनेचे वृत्त गावात कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी रीघ लावली. पोलीस ठाणे मानवत येथे माहिती मिळाल्यानंतर मानवत पोलीस ठाण्याचे शेख मन्नू व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.