नोएडा : वृत्तसंस्था
फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन भारतीय वायुदलात असलेल्या फ्रेंच लढाऊ विमानांना सहाय्य देण्यासाठी उत्तरप्रदेशच्या नोएडा शहरात एक नवी देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा स्थापन करणार आहे. भारतीय वायुदल १९८० च्या दशकात सामील करण्यात आलेल्या जवळपास ५० मिराज-२००० विमानांचे अणि मागील काही वर्षांमध्ये ताफ्यात सामील ३६ राफेल लढाऊ विमानांचे संचालन करते.
फ्रान्सच्या कंपनीने अलिकडेच संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायुदलाला यासंबंधी कळविले आहे. डसॉल्ट एव्हिएशन स्वत:कडून निर्मित लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल साहाय्य प्रदान करण्यासाठी एक नवी भारतीय कंपनी डसॉल्ट एव्हिएशन मेंटेनेन्स रिपेर अँड ओव्हरहॉल इंडिया स्थापन करणार आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीकोनाच्या अनुरुप नवी एमआरओ कंपनी स्थापन केली जाणार आहे. उत्तरप्रदेशच्या नोएडा येथील औद्योगिक क्षेत्रांमध्ये हे सुविधा केंद्र असेल असे कंपनीने संरक्षण मंत्रालयाला कळविले आहे.
नव्या भारतीय कंपनीत भारतीय नागरिक आणि डसॉल्टचे भारतातील प्रतिनिधी राहिलेले पोसिना वेंकट राव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. तसेच डसॉल्ट स्वत:च्या राफेल मरीन जेटच्या विक्रीसाठी भारतीय नौदलासोबत चर्चा करत आहे. भारतीय नौदल २६ राफेल मरीन जेट खरेदी करण्याच्या विचारात आहे. भारतीय वायुदलाने अंबाला आणि हाशिमारा येथे राफेल लढाऊ विमानांसाठी दोन तळ तयार केले आहेत.