पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून अशातच आमदार शिंदे यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल करत ते हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांत रोहित पवारांच्या काही सहका-यांनी त्यांची साथ सोडत भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार राम शिंदे यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
रोहित पवारांवर आरोप करताना राम शिंदेंनी म्हटले आहे की, रोहित पवार यांनी आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. त्यांची काम करण्याची पद्धत लोकांना पटलेली नाही. रोहित पवार यांच्या वर्तणुकीमध्ये हुकूमशाही आहे, अरेरावी आहे. ते चालू बैठकीत मोबाईल, पाण्याच्या बाटल्या आणि चाव्या अशा वस्तू फेकून मारतात. मी जर आमदार झालो नसतो तर त्यांनी नक्कीच १०-२० लोकांना मारहाण केली असती. मी विधान परिषद आमदार झाल्यामुळे त्यांचा पारा अर्ध्यावर आल्याचे लोकांकडून सांगितले जात आहे, असा दावा शिंदे यांनी केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत माझा ४२ हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आमच्या मतदारसंघातून फक्त ९ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे हे अंतर कमी झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमच्या पक्षात नवनवीन लोकांचा प्रवेश होत आहे. पुढील १५ दिवसांमध्ये मी गावभेटी घेत जनसंवाद यात्रा सुरू करणार आहे आणि लोकांशी थेट संवाद साधणार आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
मधुकर राळेभात यांचे रोहित पवारांवर आरोप
रोहित पवार यांचे समर्थक असलेले आणि कर्जत-जामखेडच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या मधुकर राळेभात यांनी नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राळेभात यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता. शरदचंद्र पवारांवर विश्वास ठेवून मी या पक्षात प्रवेश केला होता. गेली ३० वर्षे मी शिवसेनेचे काम केले. त्यानंतर मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु रोहित पवारांचे कार्यकर्त्यांसोबत जे वागणे आहे ते मला पसंत पडले नाही. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.