जालना : प्रतिनिधी
एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज नवव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले आहे.
राज्य सरकारने जानेवारीमध्ये काढलेल्या सगेसोय-यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी ते गेल्या ९ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून सायंकाळी ४ वाजता उपोषण सोडाल्याचे जाहीर केले.
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि गावातील आंदोलक यांच्या मदतीने मनोज जरांगे उपोषण सोडले.
सलग नऊ दिवस उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. डॉक्टर आणि मराठा बांधवांच्या विनंतीनंतर मध्यरात्री जरांगे पाटील यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी आज उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. जरांगे यांनी उपोषण सोडावे या मागणीसाठी याठिकाणी मोठ्या संख्येने महिला जमल्या आहेत. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आले.
उपोषण सोडताना काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आज मराठा समाज आरक्षणाची वाट पाहत आहे, शिक्षक असो किंवा पोलिस सर्व आरक्षणाची वाट पाहत आहेत. कोणतेच क्षेत्र असे नाही जिथे आरक्षणाची वाट पाहिली जात नाही. फडणवीस साहेब माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघतोय. तुम्हाला संधी आहे. ही संधी वाया जाऊ देऊ नका. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. आचारसंहिता लागू होईपर्यंत आरक्षण द्या. ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.